मुंबई:
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला.
स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्यावरील महिला अत्याचार प्रकरणामुळे चाकणकर या मोठ्या वादात सापडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
याआधी चाकणकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच महिला आयोगाच्या वतीने विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याची विनंतीही त्यांनी केली होती.
दरम्यान, चाकणकर आणि अशोक खरात यांचे एकत्रित कार्यक्रमांतील फोटो समोर आल्यानंतर वाद अधिक चिघळला. खरातच्या पाद्यपूजन कार्यक्रमात चाकणकर सहभागी झाल्याचे तसेच एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी त्याचे कौतुक केल्याचेही उघड झाले. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही त्यांच्यावर टीका वाढली होती आणि राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.
या वाढत्या दबावामुळे अखेर चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.