कोल्हापूर (करवीर) : सांगरुळ परिसरात सराफ व्यावसायिकावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक तेजस सुंदेशा (वय अंदाजे 65) यांना अज्ञात तिघांनी अडवून मारहाण करत त्यांच्या अंगावरील सुमारे 6 तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस सुंदेशा हे गेली 15 ते 16 वर्षे सराफ व्यवसाय करत असून त्यांचे दुकान दररोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असते. शनिवारी रात्री दुकान बंद करून ते सांगरूळ येथून कोल्हापूरच्या गंगावेश परिसरातील घरी जात होते. मात्र रात्री 9 वाजेपर्यंत ते घरी न पोहोचल्याने आणि फोनही न उचलल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला.
दरम्यान, सांगरुळ ते कोल्हापूर मार्गावरील मोठा भरावा परिसरात माहिती घेत असताना शेतातून मदतीसाठी ओरडण्याचा आवाज ऐकू आला. पाहणी केली असता तेजस सुंदेशा हे हातपाय व तोंड बांधलेल्या अवस्थेत शेतात आढळून आले. त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेजस सुंदेशा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगरुळ येथील विलास कॉर्नर परिसरात पोहोचताच पाठलाग करत आलेल्या तिघांनी त्यांच्या वाहनासमोर आपली गाडी आडवी लावून त्यांना अडवले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने शेतात ओढून नेऊन हातपाय बांधले. तोंडात बोळा घालून चिकटपट्टी लावली व पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांच्या अंगावरील दागिने लुटले. त्यानंतर आरोपी कोल्हापूरच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे सांगरुळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.