Sunday, April 19, 2026
HomeAdministrationअफवांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर गर्दी; प्रशासनाकडून निर्बंध लागू

अफवांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर गर्दी; प्रशासनाकडून निर्बंध लागू

कोल्हापूर, दि. 25 : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही समाजमाध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. परिणामी मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत अधिकारांचा वापर करत तातडीचे निर्बंध लागू केले आहेत.

नवीन आदेशानुसार, दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी 2000 रुपयांपर्यंतच इंधन देण्यात येणार आहे. तसेच कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन भरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक पेट्रोल पंपाला उपलब्ध साठा, प्राप्त साठा व मागणी केलेल्या साठ्याची माहिती दर्शनी फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळण्याचे आणि केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घेण्याचे आवाहन केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून हा आदेश 25 मार्च 2026 पासून तात्काळ लागू होऊन 31 मार्च 2026 पर्यंत प्रभावी राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular