कोपार्डे :
उमेद फाउंडेशन कोपार्डे ता.करवीर यांच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांना डिजिटल साधनांची उपलब्धता करून देण्यासाठी ‘लॅपटॉप लायब्ररी’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या लायब्ररीचे उद्घाटन HERE Technology चे डायरेक्टर ऑफ क्वालिटी तसेच उमेद फाउंडेशनचे संस्थापक सदस्य विनायक पाटील यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी बोलताना पाटील यांनी ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असून, डिजिटल शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन केले. तसेच ‘वापरा-शिका-हस्तांतरित करा’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानवाटपाची साखळीनिर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थापक अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी या लायब्ररीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक तांत्रिक साधने मिळणे कठीण असते. अशा परिस्थितीत उमेदची ही लॅपटॉप लायब्ररी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोठा आधार ठरेल. प्रा. एस. पी. चौगले यांनीही मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमास उमेदचे संस्थापक सदस्य प्रदीप नाळे, तातोबा डांगे, वैशाली पाटील, नवीनचंद्र सनगर, डॉ. तुकाराम खाडे, सागर पेंडूरकर, महेश खाडे, सचिन बगाडे, ओंकार चौगले, विक्रम तोडकर, राज गाताडे तसेच ‘उमेद मायेचं घर’मधील विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी केले, तर आभार संदीप कुंभार यांनी मानले.