Sunday, August 9, 2026
HomeAdministrationखुपिरे ग्रामीण रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई; नागरिकांच्या तक्रारीनंतर निर्णय

खुपिरे ग्रामीण रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई; नागरिकांच्या तक्रारीनंतर निर्णय

दोनवडे प्रतिनिधी:

कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांविरोधात अखेर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारी, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

रुग्णालयातील विनोद मारुडा, नितीन कांबळे आणि आशुतोष डंगोरे या चतुर्थ सेवा  कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत तसेच वर्तणुकीबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. रुग्णांशी अयोग्य वर्तन, सेवेमध्ये हलगर्जीपणा आणि वेळेचे पालन न करणे यांसारख्या मुद्द्यांवरून वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही त्यांच्या वागणुकीत कोणताही सकारात्मक बदल दिसून आला नाही.

यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेत या तिघांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईमुळे रुग्णालयातील शिस्त व सेवा सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, खुपिरे ग्रामीण रुग्णालयात अद्यापही डायलिसिस सेंटरची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू करण्याची घोषणा सुमारे वर्षभरापूर्वी केली होती. मात्र, अद्याप त्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही.

यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, लवकरात लवकर डायलिसिस सेंटर सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूर शहरात जावे लागत असल्याने आर्थिक व शारीरिक त्रास वाढत आहे.

एकीकडे कर्मचाऱ्यांवर कारवाई होत असताना, दुसरीकडे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या सर्व बाबींवर तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular