Wednesday, August 26, 2026
HomeCrimeसावरवाडीत दिवसाढवळ्या धाडसी चोरी; पाच लाखांचा ऐवज लंपास

सावरवाडीत दिवसाढवळ्या धाडसी चोरी; पाच लाखांचा ऐवज लंपास

बहिरेश्वर प्रतिनिधी : सावरवाडी (ता. करवीर) येथे दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना घडली असून, चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून सुमारे चार ते पाच तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा जवळपास पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सावरवाडी येथील राज्य मार्गालगत महादेव नगर परिसरात कृष्णात दादू कारंडे यांचे घर आहे. कारंडे हे कामानिमित्त बाहेर गेले होते, तर त्यांच्या पत्नी शेतात कामासाठी गेल्या होत्या. त्यांचा मुलगा तुषार हा घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावरील जनावरांच्या गोठ्यात जनावरांना पाणी पाजण्यासाठी व वैरण घालण्यासाठी गेला होता. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी भरदुपारी घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील दोन्ही सोप्यांमधील तिजोऱ्या फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. यामध्ये सुमारे दोन तोळ्यांची गंठणपट्टी, एक तोळा कानवेल व झुमके, अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र तसेच रोख रक्कम असा ऐवज असल्याचे सांगण्यात आले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी शेताच्या दिशेने मागील बाजूने पोबारा केला.

कृष्णात कारंडे घरी परतल्यानंतर घरातील चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ माजी पोलीस पाटील गजानन खोत यांना माहिती देऊन करवीर पोलीस ठाण्यात वर्दी दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून तपास सुरू केला.

या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे सावरवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular