कोल्हापूर: ( प्रतिनिधी):
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामात प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांची अभूतपूर्व मोटारसायकल जनजागृती रॅली काढण्यात आली. दिवसभरात तब्बल १८५ किलोमीटरचा टप्पा पार करणाऱ्या या रॅलीने संपूर्ण जिल्हा ढवळून काढला असून, शेतकऱ्यांच्या या विराट एकजुटीमुळे साखर कारखानदार आणि जिल्हा प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतली आहे.
हातकणंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा जोतिबा फुले व डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून या ऐतिहासिक रॅलीची सुरुवात झाली. यामध्ये हजारो शेतकरी आपल्या दुचाकी गाड्यांसह, हातात संघटनेचे झेंडे घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. “पहिली उचल ४५०० रुपये मिळालीच पाहिजे,” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
सदरची रॅली हातकणंगले येथून सुरू होऊन कुंभोज, नरंदे, सावर्डे, वडगाव, वठार, वारणानगर, वाघबीळ, आसुर्ले पोर्ले, खुपिरे, सांगरूळ, सडोली खालसा, परिते, बिद्री, वाळवे, सिद्धनेर्ली आणि कागल या प्रमुख गावांमधून मार्गस्थ झाली. रॅलीच्या मार्गावरील प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी आणि महिलांनी ठिकठिकाणी रॅलीचे औक्षण करून आणि पुष्पवृष्टी करून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. कसबा सांगाव येथे या भव्य रॅलीची सांगता झाली.
रॅली दरम्यान खुपिरे गावाने सामाजिक एकतेचे आणि शेतकरी जिव्हाळ्याचे अनोखे उदाहरण दाखवले. खुपिरे येथील ग्रामस्थांनी रॅलीत सहभागी झालेल्या हजारो शेतकऱ्यांसाठी दुपारच्या भोजनाची अत्यंत शिस्तबद्ध व्यवस्था केली होती.
या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कर्नाटक सीमाभागातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी यावेळी एकत्र आले आहेत. दोन्ही राज्यांतील सीमाभागातील शेतकऱ्यांनी एकजूट केल्यामुळे कारखानदारांना ऊस पळवून नेणे किंवा कमी दरात गाळप करणे अशक्य झाले असून, कारखानदारांची मोठी कोंडी झाली आहे. या रॅलीमुळे जिल्ह्यातील ऊस आंदोलनाला प्रचंड बळकटी आली आहे.
रॅलीच्या सांगता सभेत बोलताना राजू शेट्टी यांनी कारखानदार आणि प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिला आहे. “शेतकऱ्यांचा ऊस हा काही फुकटचा नाही. घामाची योग्य किंमत मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. येत्या चार दिवसांत जर कारखानदार आणि प्रशासनाने एकत्र बसून समाधानकारक तोडगा काढला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यापेक्षाही अधिक तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडेल, अशी रणनीती त्यांनी जाहीर केली आहे. या इशाऱ्यामुळे आता सर्वांचे लक्ष प्रशासकीय हालचालींकडे लागले आहे.