बीड : ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी टोलनाक्यावर करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विवेकानंद पाटील आणि रविराज साबळे यांच्यासह एकूण २२० जणांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ऊस दरवाढ आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे.
शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन ४२०० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पाडळसिंगी टोलनाक्यावर आंदोलन छेडले होते. यावेळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल साडेतीन तास वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवासी, वाहनचालक आणि इतर नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
विनापरवाना आंदोलन केल्याचा ठपका
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित रास्ता रोको आंदोलनासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. आंदोलनातील प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि सहभागी अशा एकूण २२० जणांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ऊस दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
एकीकडे शेतकरी ऊस दरवाढीसाठी आक्रमक झाले असताना दुसरीकडे आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने ऊस दराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू असतानाच पोलिसांच्या कारवाईमुळे शेतकरी संघटनांची पुढील भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

