Monday, November 23, 2026
HomePoliticalगोकुळच्या न्यायालयीन लढ्यासाठी ८० लाख खर्च; सतेज पाटील यांचा संताप, तर...

गोकुळच्या न्यायालयीन लढ्यासाठी ८० लाख खर्च; सतेज पाटील यांचा संताप, तर राजू शेट्टींची ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ म्हणत टीका

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष निवडीवरून रंगलेल्या न्यायालयीन संघर्षासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ विधिज्ञ आणि भारताचे माजी महान्यायवादी ॲड. मुकुल रोहतगी यांना तब्बल ८० लाख रुपये मानधन मंजूर केले आहे. या मानधनापोटी प्राप्तिकराची १० टक्के रक्कम कपात करून ७२ लाख रुपये अदा करण्याचा शासन निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. मात्र, राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना वकिली शुल्कापोटी एवढी मोठी रक्कम खर्च केल्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपासून अध्यक्ष निवडीपर्यंत राजकीय संघर्षाबरोबरच न्यायालयीन लढाईही चांगलीच गाजली. सत्र न्यायालयापासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत या प्रकरणाचे पडसाद उमटले. अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण झाल्यानंतर समविचारी आघाडीचे संचालक शशिकांत पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये शासनाची बाजू मांडण्यासाठी ॲड. मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

९ नोव्हेंबर रोजी त्यांनी शासनाच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली होती. या कामासाठी रोहतगी यांनी शासनाकडे ८० लाख रुपयांचे मानधन मागितले होते. शासनाने हे देयक मंजूर केले असून, १० टक्के प्राप्तिकर कपात करून त्यांना ७२ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळात ८० लाखांची उधळपट्टी : सतेज पाटील

राज्य शासनाच्या या निर्णयावर आमदार सतेज पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती सरकारने साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर केला. एकीकडे राज्यातील दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आहे, विकासकामांसाठी निधीची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील शासननियुक्त चार संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल ८० लाख रुपये वकिली शुल्कापोटी खर्च केले जात आहेत. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याची टीका त्यांनी केली.

तसेच, आपल्या संदेशाच्या शेवटी त्यांनी ‘#लक्षातठेवलंय२०२९’ असा सूचक इशाराही दिला आहे.

‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’; राजू शेट्टींचा टोला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही सरकारच्या निर्णयावर जोरदार हल्लाबोल केला. गोकुळच्या निवडणुकीत राज्य सरकारने नियुक्त केलेले महाभियोक्ता सक्षम नसल्याने तब्बल ८० लाख रुपये खर्च करून ॲड. मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यात आली. शासन जनतेच्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी करत असल्याचे त्यांनी म्हटले.

‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी सरकारच्या खर्चाच्या धोरणावर निशाणा साधला.

गोकुळच्या सत्तासंघर्षात न्यायालयीन लढाईसाठी झालेला हा मोठा खर्च आता नव्या राजकीय वादाचे कारण ठरला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी न्यायालयीन कामकाजासाठी ८० लाख रुपये खर्च करण्याची सरकारला गरज का भासली, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular