Tuesday, August 25, 2026
HomeCrimeबेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व गर्भपात करणाऱ्या ‘एस.पी. गँग’वर मोक्का

बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व गर्भपात करणाऱ्या ‘एस.पी. गँग’वर मोक्का

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग निदान, गर्भपात तसेच बोगस वैद्यकीय व्यवसाय करून नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या ‘एस.पी. गँग’विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या कारवाईस मंजुरी दिली आहे. राज्यातील बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व गर्भपात प्रकरणात मोक्का कायद्यांतर्गत झालेली ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.

करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोगावती सहकारी साखर कारखाना, शाहूनगर-परिते येथील ब्लॉक क्रमांक ५, रूम क्रमांक ४ येथे कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि वैद्यकीय तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली होती. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७०/२०२६ अन्वये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या तपासात संबंधित आरोपींकडे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा अधिकृत वैद्यकीय शिक्षण नसतानाही बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले. आरोपींकडून गर्भवती महिलांना हेरणे, गर्भलिंग तपासणीसाठी ग्राहक मिळविणे, बेकायदेशीरपणे सोनोग्राफी मशीनची व्यवस्था करणे, तपासणीसाठी जागा शोधणे तसेच अनेकदा रुग्णांच्या घरी जाऊन गर्भलिंग तपासणी करणे, अशी कार्यपद्धती वापरली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

गर्भातील स्त्रीभ्रूण असल्याचे आढळल्यास बेकायदेशीर गर्भपाताची व्यवस्था केली जात असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या टोळीचा पूर्वइतिहास तपासला असता २०२० ते २०२६ या कालावधीत करवीर पोलीस ठाण्यात सात, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात एक, राधानगरी पोलीस ठाण्यात दोन आणि भुदरगड पोलीस ठाण्यात एक, असे बेकायदेशीर गर्भलिंग निदान, गर्भपात व बोगस डॉक्टरांशी संबंधित एकूण ११ गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले.

या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविला.

कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी प्रस्तावाची छाननी करून तो पुढील कार्यवाहीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर केला. टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि मोक्का कायद्यातील निकषांची पडताळणी केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी संबंधित टोळीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाईस मंजुरी दिली.

मोक्का कारवाईतील आरोपी :

  1. स्वप्निल केरबा पाटील (वय ३५), रा. जयभवानी तरुण मंडळाजवळ, बालिंगा, ता. करवीर, जि. कोल्हापूर — टोळीप्रमुख.

  2. महेश सुबराव पाटील (वय ३५), व्यवसाय शेती, रा. सिरसे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर.

  3. श्रीमंत तानाजी पाटील (वय ३७), व्यवसाय पोल्ट्री, रा. परिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर.

बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी मोक्का कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमुळे संबंधित टोळीला मोठा धक्का बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular