मुंबई प्रतिनिधी :महाराष्ट्राला मोठी संत परंपरा असून त्याचा आशीर्वादाने राज्यकारभार सुरु आहे राज्यात संतांच्या केसांनाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी आक्षेप घेतला आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या विधानाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अप्रत्यक्ष समर्थन होत आहे का? असा प्रश्न सोलापूर येथील पत्रकार परिषदेत दलवाई यांना विचारण्यात आला होता. यावेळी दलवाई म्हणाले, महंत रामगिरी महाराजांना अटक झाली पाहीजे. उद्या कुणी रामाबद्दल बोलले तर चालेल का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सोलापूर येथील पत्रकार परिषदेत बोलत असताना हुसेन दलवाई म्हणाले की, महंत रामगिरी यांना अटक झाली पाहीजे. आपल्या समाजात एकमेकांच्या धर्माचा आदर केला जातो. ईदला हिंदू आणि दिवाळीला मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात. ही या देशाची परंपरा आणि संस्कृती आहे. या लोकांना आपली संस्कृती बदलायची आहे. मुख्यमंत्री जर अशा प्रवृत्तीला समर्थन देत असतील तर मुख्यमंत्र्यांना हटवले गेले पाहीजे, अशी मागणी दलवाई यांनी केली.
हुसेन दलवाई पुढे म्हणाले, राज्यात असा मुख्यमंत्री चालू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी काही तरी डोके चालवून काम करावे, अशीही टीका हुसेन दलवाई यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, या मागणीसाठी दलवाई राज्यभर दौरा करत आहेत.