Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomeSocialस्वप्निलचे यश युवा पिढीसाठी प्रेरणादायी-आ. ऋतुराज पाटील

स्वप्निलचे यश युवा पिढीसाठी प्रेरणादायी-आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर :

ऑलिम्पिकमध्ये तब्बल ७२ वर्षांनी पदक जिंकत स्वप्नील कुसाळे याने क्रीडानगरी कोल्हापूरच्या वैभवात भर घातली आहे. स्वप्निलच यश हे युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केले. तर वेड लागल्या शिवाय इतिहास घडत नाही, येणाऱ्या काळात देशासाठी सुवर्ण पदक पटकावणे हेच माझे ध्येय असल्याचे ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसाळे याने सांगितले. डी.वाय.पाटील ग्रुप तर्फे हॉटेल सयाजी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत ते होते.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकणारा नेमबाज स्वप्निल कुसाळे यांचे आज कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. डी. वाय. पाटील ग्रुपच्या वतीने हॉटेल सयाजी येथे कोल्हापूरच्या या सुपुत्राचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हातात तिरंगा ध्वज घेऊन हॉटेल सयाजी प्रवेशद्वाराच्या दुतर्फा थांबलेल्या कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्साहात स्वागत केले. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची मुर्ती, शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वप्निल व कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, खाशाबा जाधव यांच्या नंतर 72 वर्षानंतर ऑलिंपिकमध्ये कोल्हापूरला स्वप्नीलने पदक मिळवून दिले. यामुळे क्रीडानगरी कोल्हापूरच्या वैभवात भर पडली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी क्रीडा, कला, सांस्कृतिक क्षेत्राला पाठबळ दिले असून सर्व क्षेत्रात कोल्हापूरचा दबदबा आहेच.

स्वप्निलच हे यश युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. एखादा खेडेगावातील युवक सुद्धा कष्टाच्या जोरावर ऑलिंपिक सारख्या स्पर्धेमध्ये यश मिळू शकतो, हा विश्वास स्वप्नीलने कोल्हापूरच्या आणि महाराष्ट्राच्या युवा वर्गामध्ये निर्माण केलेला आहे. स्वप्निलच्या यशामध्ये अखंडपणे त्याला साथ देणारे त्याची आई वडील आणि सर्व कुटुंबीय यांचे सुद्धा कौतुक करावे तेवढे थोडे आहे. यापुढेही स्वप्निलच्या यशाचा हा आलेख चढत राहील आणि भविष्यात तो देशासाठी सुवर्णपदक मिळवून देईल असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यानी व्यक्त केला.

स्वप्निल कुसाळे म्हणाला, डी. वाय. पाटील ग्रुपने केलेला हा स्वागत समारंभ भारावून टाकणारा आहे. हे यश माझ्या एकट्याचे नाही तर संपूर्ण कोल्हापूर, महाराष्ट्र आणि सर्व देशवासीयांचे आहे. पॅरीसमधील पदक ही पहिली पायरी आहे, आपल्याला यशाचे शिखर अजून गाठायचे आहे. वेड लागल्या शिवाय इतिहास घडत नाही, येणाऱ्या काळात आणखी जोमाने तयारी करून देशासाठी सुवर्ण पदक पटकावणे हेच माझे ध्येय आहे.

यावेळी हॉटेल सयाजीच्यावतीने जनरल मॅनेजर अमिताभ शर्मा व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापून स्वप्निलच्या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी डी.वाय.पाटील ग्रुप, व सयाजी हॉटेलचे कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News