कोल्हापूर: महिला अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे. त्यावर करावयाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हा प्रशासनान प्रत्येक शाळा, त्यातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच एकत्रितरीत्या समुपदेशन करावं. त्यातून भविष्यात घडणार्या अत्याचाराच्या घटना टळतील याकडे प्रशासनाने गांभीर्यान लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारणीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकड निवेदनाद्वारे केली.
कोलकत्ता इथं निवासी वैद्यकीय महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. बदलापूर इथं दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिये इथल्या परप्रांतीय १० वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिचा निर्घृण खून करण्यात आला. अत्याचाराच्या घटनांत दिवसेंदिवस होत असलेली वाढ, देशवासीयांसाठी निश्चितच चिंताजनक आहे. या घटना रोखणं गरजेचं आहे. लेक वाचवा, लेक शिकवा या घोषणेची गांभीर्यानं अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीकडून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आ़लं. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या स्वराज्यात लेकी-सुनांचा सन्मान केला. आज मात्र आपण सुराज्याच्या पथावर असताना आपल्याच लेकी-सुनांवर अन्याय-अत्याचार होत आहेत. जिल्हा स्तरावर विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचं समुपदेशन गरजेचं आहे. त्यातून अशा घटना वेळीच रोखण्यात मदत होईल, असं जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात चौगुले, सचिव सुरेश पाटील, कार्याध्यक्ष दत्तात्रय बोरगे, शहराध्यक्ष प्रमोद व्हनगुत्ते, रूपाली चव्हाण, सुरेखा शेजाळे, बाळासाहेब कोळेकर, विनोद धनवडे,मधू धनवडे, मदन अहिरे, मुरलीधर कांबळे, नाझ अत्तार, आकाश कांबळे, निरंजन कामत, अॅड. प्रमोद दाभाडे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.