दिंडनेर्ली (सागर शिंदे): अभ्यास केला नसल्याने शाळेतील शिक्षक रागावले म्हणून शाळा सोडून गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांला इस्पूर्ली पोलिसांनी दोन तासात शोधून काढले.एकीकडे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सहायक पोलीस निरीक्षीका टी.जे. मगदूम यांनी तात्काळ दखल घेत स्वतः शोध घेवून विद्यार्थ्याला पालकांच्या स्वाधीन केले. इस्पूर्ली पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
इस्पूर्ली(ता.करवीर) च्या पश्चिमेला असणाऱ्या एका इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेतील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला अभ्यास केला नसल्याच्या कारणावरून शिक्षक रागावले होते.त्या रागातून एक विद्यार्थी सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान शाळेतून कुणाला काहीही न सांगता निघून गेला. काही वेळानंतर शिक्षकांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला.सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता तो एकटाच जात असल्याचे दिसून आले.त्यानंतर शिक्षकांनी आजू बाजूला सर्वत्र शोध घेतला पण कुठेच थांगपत्ता लागेना.त्यामुळे शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांच्या वडिलांना माहिती दिली.त्यांनीही नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडे चौकशी केली पण कुठेच शोध लागला नाही. मंगळवारी सकाळी इस्पूर्ली पोलिसांत तक्रार देण्यासाठी वडील व शिक्षक गेले असता त्यांच्याकडून पोलिसांनी सर्व माहिती घेतली.काही वर्षांपूर्वी तो कोल्हापुरातील एका तालमीमध्ये कुस्तीचा सराव करण्यासाठी राहत होता अशी माहिती मिळाली.त्या आधारे पोलिसांनी कोल्हापुरातील सबंधित तालमी मध्ये जाऊन माहिती घेतली असता तो मुलगा काही वेळापूर्वीच तिथे येऊन गेल्याचे समजले. त्यामुळे महालक्ष्मी मंदिर परिसरात शोध घेत असताना एका रिक्षा स्टॉप वरती विद्यार्थी दिसून आला. त्याला विश्वासात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये येऊन चौकशी केली.आपण अभ्यास न केल्याने शिक्षक रागावले होते या रागातूनच बाहेर गेलो असल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. स.पो. नि मगदूम यांनी त्याला समुपदेशन करून वडिलांच्या ताब्यात दिले. मुलगा सुखरूप आल्यामुळे आई वडिलांना अश्रू अनावर झाले तर शिक्षकांचा जीव भांड्यात पडला. तात्काळ घेऊन दखल घेत तपास केल्याबद्दल आई-वडिलांनी व शिक्षकांनी पोलिसांचे आभार मानले. सहायक पोलीस निरीक्षीका टी.जे. मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली,सहाय्यक फौजदार अजित देसाई,पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम पाटील यांनी तपास केला.