साळवण प्रतिनिधी (एकनाथ शिंदे):गगनबावडा तालुक्यातील तिसंगी कॉलेजसमोर अनेक दिवस फिरणाऱ्या रोड रोमिओंवर गगनबावडा पोलिसांनी कडक कारवाई केली .
कॉलेजला जाणाऱ्या मुलींना त्रास देणाऱ्या या रोड रोमिओंची पोलिसांनी कसून चौकशी केली. गगनबावडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी ट्रॅफिक विभागातील दिगंबर पाटील व इंजूळकर यांनी ही कारवाई केली. रोड रोमिओंनी कॉलेज परिसरात विद्यार्थिनींना त्रास देणे, अश्लील बोलने आणि सार्वजनिक ठिकाणी गैर(चुकीचे) वर्तन करणे यामुळे विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारांबाबत नागरिकांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ हे म्हणाले की, रोड रोमिओंवर नजर ठेवून त्यांची चौकशी करण्यात आली असून, भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून कठोर पावले उचलली जातील. या कारवाईमुळे तिसंगी कॉलेज परिसरातील विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे स्थानिक रहिवासी आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गगनबावडा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी जेणेकरून पोलिस त्वरित कारवाई करू शकतील आणि परिसरात शांतता आणि सुरक्षितता राखली जाईल.