दिंडनेर्ली सागर शिंदे : जी बस दररोज शाळेला घेऊन जायची व दारात आणून सोडायची तीच बस आलीना साठी गुरुवारी दुपारी काळ बनून आली. बस मधून घराच्या दारात उतरताच बस खाली चिरडून चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याने येवती सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
येवती (ता.करवीर) येथील आलीना फिरोज मुल्लानी( वय ५ वर्षे) ही इस्पुर्ली येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत केजीच्या वर्गात शिकत होती.शाळा सुटल्याबरोबर वर्गातील शिक्षकांना बाय बाय करीत चिमुकल्या मैत्रिणींच्या सोबत नेहमीप्रमाणे स्कूल बसमध्ये बसली होती. शाळेपासून अवघ्या तीन किलोमीटर वरती असणाऱ्या तिच्या गावात बस ठीक ठिकाणी विद्यार्थी उतरत आलीनाच्या दारात थांबली. बसमधील इतर मुला-मुलींना बाय बाय केला अखेरचाच . कारण ती बसच तिच्यासाठी काळ बनून आली होती. आलीना बस मधून उतरताच कुणाला काही समजायच्या आतच ती बसच्या चाकाखाली चिरडली गेली.दारात असून ही मम्मी,पप्पा मला वाचवा असे म्हणायची संधी देखील मिळाली नाही. घराच्या दारातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून आईने फोडलेला हंबरडा उपस्थितांच्या काळजावर घाव घालत होता. कुटुंबीयांचा आरडाओरड सुरू होताच बसमधील इतर मुले निरागस मनाने गर्दीत आलिना ला शोधत होतीत पण दररोज शाळेत येणारी आलीना त्यांना टाटा बाय-बाय करीत कधीच देवाघरी गेली होती तीही पुन्हा न येण्यासाठी. दोनच दिवसापूर्वी शाळेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला होता. या कार्यक्रम प्रसंगी आलीना च्या आई-वडिलांनी तिला राधेची वेशभूषा केली होती. हिंदू मुस्लिम कोणताही भेदभाव न मानता गावातील सर्व सणांमध्ये उत्साहाने भाग घेणाऱ्या मुल्लानी कुटुंबीयांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे.