मुंबई : विधानसभेसाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. एकीकडे महायुतीमधील नेत्यांचे दौरे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून नेते मंडळी मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणीही सुरु असून मॅरेथॉन बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे. या बैठकांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा झाली. तसेच भाजपाचे नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.



