सिंधुदुर्ग : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता या प्रकरणी नितीन गडकरींनी पुतळा उभारण्यातील एक चूक लक्षात आणून दिली आहे.
मालवणमध्ये उभारलेल्या पुतळ्यात स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर पुतळा कोसळला नसता, असे विधान नितीन गडकरी यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ज्याचे पडसाद राज्यात उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी माफी मागितली. आता भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुतळा उभारणी करताना स्टेनलेस स्टिलचा वापर करायला हवा होता, असे विधान केले आहे. समुद्र किनारी खारे वारे असल्यामुळे येथे स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर पुतळा कोसळला नसता, असे विधान दिल्ली येथील एका कार्यक्रमात बोलत असताना नितीन गडकरी यांनी केले.
“मागच्या तीन वर्षांपासून समुद्रकिनारी उभारण्यात येणाऱ्या रस्ते आणि त्यावरील पुलासाठी स्टेनलेस स्टिलचा वापर करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे. मी मुंबईत असताना ५५ उड्डाण पूल बांधले होते. त्यावेळी एका व्यक्तीने मला उड्डाण पुलांची पाहणी करण्यासाठी बोलावले. पुलाचे बांधकामात वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सळ्यांवर तो पावडर कोटिंग करून वापरत असल्याचे दिसले. यावर प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, यामुळे सळ्या गंजरोधक होतात. पण तरीही सळ्यांना गंज पकडल्याचे मला दिसले. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यापासून तीस किमीच्या अंतरावर असलेल्या बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर झाला पाहिजे, असे मत मी मांडत आलो. जर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर तो पुतळा पडला नसता.