मुंबई:विधानसभेची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसे राज्यात घडामोडींना वेग आला आहे. सध्या सर्वच पक्षांच्या नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. याच बरोबर महायुतीतील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागावाटपाबाबतही खलबतं सुरु आहेत. मात्र, असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रुपाची चाकणकर यांचं नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे अजित पवार गटातील मतभेद समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फेसबुक पोस्ट करत “एकाच महिलेला किती संधी देणार?”, असं म्हणत सवाल उपस्थित केले आहेत.
रुपाली पाटील-ठोंबरेंची फेसबुक पोस्ट काय? “एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार न्याय नक्की देतील, असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? कालपासून बातमी वाचत आहे. बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही, असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत. त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत. त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल”, असं रुपाली पाटील-ठोंबरे यांनी म्हटलं आहे.