कोल्हापूर प्रतिनिधी : हुबळीहून मिरज मार्गे पुण्याला जाणारी वंदे भारत रेल्वे, आता कोल्हापूर मार्गे पुण्याला जाईल. सुरुवातीला आठवड्यातील तीन दिवस, हुबळीहून आलेली वंदे भारत एक्सप्रेस, कोल्हापुरातून प्रवासी घेऊन पुण्यापर्यंत धावेल. मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे अद्याप दुहेरीकरण झाले नसल्याने वंदे भारतसह, नवीन गाड्या सुरू होण्यास अडथळा निर्माण होत आहे. पण हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूर मार्गे जाणार, ही आश्वासक सुरुवात आहे. लवकरच कोल्हापूर-मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची आशा आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
केंद्रातील मोदी सरकारनं पायाभूत सुविधांच्या विकासाकडं लक्ष दिलंय. संपूर्ण भारतीय बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस, अल्पावधीत अत्यंत लोकप्रिय झाली आहे. वेगवान आणि आरामदायी अशी वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांची गर्दी खेचत आहे. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी, अशी कोल्हापूरकरांची इच्छा आहे. खासदार धनंजय महाडिक सातत्यानं कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान आठवड्यातून तीन दिवस हुबळी ते पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावेल, असे नुकतेच जाहीर झाले.