दिंडनेर्ली प्रतिनिधी(सागर शिंदे): निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी दरम्यान मंगळवारी रात्री ट्रक आणि बोलोरो गाडी यांच्यामध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना मदत न करता पळून जाण्याचा उद्देशाने अपघातानंतर ट्रकचालक सुसाट वेगाने निघून गेला होता.
पोलिसांना याची माहिती होताच पोलिसांनी तात्काळ करवीर, राधानगरी व भुदरगड तालुक्यातील पोलीस ठाण्यांना वायरलेस यंत्रनेवरून नाकाबंदीचे आदेश दिले होते.याची तात्काळ दखल घेत इस्पूर्ली पोलीस स्टेशन च्या सहाय्यक पोलिस निरीक्षीका टी.जे.मगदूम यांनी पोलीस स्टेशन मधील कर्मचारी यांना नाकाबंदी करण्यास सांगितले.काही वेळातच गारगोटी हून कोल्हापूर च्या दिशेने एक ट्रक वेगाने येत असल्याचे दिसताच त्याला थांबवून माहिती घेतली असता हाच ट्रक (क्रमांक केए२८ AA ८२०६) अपघात करून आला असल्याचे दिसुन येताच पोलीस हवालदार राम पाडळकर, पोलीस कॉन्स्टेबल पंकज बारड, पोलीस नाईक सरिता सुतार यांनी ट्रक व चालक याला राधानगरी पोलिसांच्या ताब्यात दिले. इस्पूर्ली पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.