दिंडनेर्ली ( सागर शिंदे): इस्पूर्ली पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत म्हाळुंगे(ता.करवीर) येथील चार तरुण मंडळानी नृत्यांगनाचा ग्रुप डान्स कार्यक्रम रद्द करून ध्वनी मर्यादेचे पालन करीत डॉल्बीच्या ठेक्यावरती ताल धरत मिरवणूक काढून गणेश मूर्तीचे विसर्जन केले.
बुधवारी रात्री नंदगाव (ता.करवीर) येथील त्रिमूर्ती तरुण मंडळ व जय हनुमान तालीम मंडळ यांच्यावतीने गणेश उत्सवानिमित्त ग्रुप डान्स चे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार गणेशोत्सव मध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यास परवानगी नसल्याचे कारण देत इस्पूर्ली पोलीस ठाण्याच्या स.पो.नि टि.जे.मगदूम यांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली.त्यामुळे मंडळातील कार्यकर्त्यांनी गावातील प्राथमिक शाळेजवळील चौकामध्ये जवळजवळ एक तास रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. मुख्य रस्त्यामध्येच बसल्यामुळे एक तासभर वाहतूक ठप्प झाली होती.आक्रमक झालेल्या तरुणांना पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला परंतु परवानगी देत नसेल तर आम्ही गणेश मूर्तीचे विसर्जन करणार नाही या भूमिकेवर ठाम होते.त्यामुळे काही वेळ चौकाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.अखेर एक तासानंतर स.पो.नि.टि.जे.मगदूम यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली.त्यांनतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली. इस्पूर्ली परिसरातील कित्येक गावांमध्ये दरवर्षी मिरवणुकीमध्ये डान्स ग्रुपचे आयोजन करण्यात येत असते.त्यामुळे पोलसांनी तरुण मंडळाना वारंवार सूचना देऊन असे कार्यक्रम करू देणार नसल्याची ठाम भुंमिका घेतली आहे.त्यामुळे म्हाळुंगे येथील राजीवजी तरुण मंडळ,जय हनुमान तालीम मंडळ ,न्यू जय शिवराय तरुण मंडळ ,श्रीराम कला क्रीडा सांस्कृतिक व्यायाम मंडळ यांनी डान्स ग्रुप चे कार्यक्रम रद्द करून मिरवणुका काढल्या. त्यामुळे अशा मंडळाचा आदर्श इतर गावातील मंडळांनीही घ्यावा असे आवाहन पोलसांनी केले आहे.
सर्वांना समान न्याय द्या
आजपर्यंत आमच्याच गावाला परवानगी नाकारून आमच्यावरतीच कारवाईचा बडगा उगारला जातो.परिसरातील इतर गावात मिरवणुका काढून नियमांचे उल्लंघन केले जाते तेव्हा पोलीस प्रशासन काहीच कारवाई करीत नाही .त्यामुळे इथून पुढे कारवाईत दूजाभाव झाला तर इसपूर्ली पोलीस स्टेशन वरती मोर्चा काढला जाईल असे नंदगाव मधील एका कार्यकर्त्यांने रास्ता रोकोप्रसंगी भर चौकात सांगितले. कारवाई मध्ये कोणत्याही प्रकारचा दुजाभाव केला जाणार नसून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवरती कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. ॲडव्हान्स जाणार वाया.. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाकडून मिरवणुकीला आडकाठी होणार नसल्याचे गृहीत धरून परिसरातील कित्येक मंडळांनी डॉल्बी,डान्स ग्रुप, जनरेटर, ट्रक ट्रॅक्टर साठी हजारो रुपयांची ॲडव्हान्स कार्यक्रम बुकिंग करतेवेळी दिलेली आहे.पण राजकीय दबाव झुगारून डान्स ग्रुप चे कार्यक्रम होऊ दिले जात नसल्यामुळे ही रक्कम मंडळांना परत मिळणार नसल्याने अशी तरुण मंडळे चिंतेत आहेत. तर असे अश्लील हावभाव करून नृत्यांगना नाचविणारे करणारे कार्यक्रम रद्द केल्यामुळे समाजातील कित्येक लोकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.