कोल्हापूर :सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे रोगजंतूंचा प्रसार वेगाने होतो तसेच सार्वजनिक मालमत्ता विद्रूप होते. तंबाखू, मावा, गुटखा खाणे , थुंकणे यामुळे अनेक प्रकारचे कॅन्सर होतात.
याविषयी जागृती होण्यासाठी तसेच अशा थुंकीचंदांच्या गलिच्छ सवयीला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत याकरिता गेले तीन वर्ष नागरिक एकत्र येऊन कोल्हापूर स्वच्छ व निरोगी होण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळ नेटाने प्रयत्न करत आहे.. सार्वजनिक गणेशोत्सव हे समाज प्रबोधनाचे भक्कम माध्यम असल्याच्या पार्श्वभूमीवर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आज राजारामपुरी येथे ठीक ठिकाणी याबाबत प्रबोधन उपक्रम केले. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे गलिच्छ जिणे लाजिरवाणे, काका मामा थुंकता तुम्ही, आजारी पडतो आम्ही, थुंकणारा नवरा नको ग बाई, बुरी आदते छोडो अशा प्रकारचे संदेश असणारे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. देखावा पाहायला आलेल्या अनेकांनी या फलकां सोबत स्वतःचे छायाचित्र काढून हा अत्यंत गरजेचा उपक्रम आहे अशी दादही दिली.
या कार्यक्रमाचे नियोजन दीपा शिपुरकर, विजय धर्माधिकारी, नीना जोशी यांनी केले. राहुल राजशेखर, संघसेन जगतकर, ललित गांधी, अभिजीत गुरव, अजय कुरणे, ललिता गांधी, दिपाली जाधव, संध्या मोहिते तसेच चळवळीचे इतर कार्यकर्ते, लहान मुले यांनी उपक्रमात भाग घेतला.