शिये वार्ताहर: भुयेवाडी ( ता. करवीर ) येथील वारणा बझारच्या शाखेतून वारणा साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना पिवळ्या रंगाची पिठीसाखर वितरित केली जात असल्याने साखरेच्या दर्जाबाबत सभासदातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वारणा साखर कारखान्याच्या सभासदांना दरमहा २ रुपये प्रति किलो प्रमाणे ९ किलो शेअर्स वरील साखर देण्यात येते. ही साखर बारीक व पांढरीशुभ्र असायची पण सप्टेंबर महिन्यात वितरित होणारी साखर पिवळ्या रंगाची व निकृष्ट दर्जाची आहे.तर याच वारणा बझारात खुल्या विक्रीसाठी ठेवलेली दालमिया शुगरची साखर मोठी व पांढरीशुभ्र आहे. पिवळ्या साखरेबाबत सभासदांकडून वारणा बझार शाखाधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता या महिन्यात आलेली साखर पिवळी आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांना कळविले आहे.पण अद्याप काही निर्णय आलेला नाही. दरम्यान काही सभासदांनी या पिवळ्या साखरेबाबत साखर कारखान्याचे एमडी संजय भगत यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी सभासदांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे साखर कारखान्याच्या या कारभारामुळे कर्मचाऱ्यांना मात्र प्रत्यक्षात सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कारखाना प्रशासनाने पिठ्ठी साखरेबाबत योग्य तो निर्णय घेऊन पूर्वीप्रमाणे पांढरीशुभ्र साखर द्यावी अशी मागणी सभासदातून होत आहे.