सांगरूळ /वार्ताहर:
परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यांना पाहण्यास दिली जाते तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती पालकांना मिळावी म्हणून पालक मेळावा पालक भेट असे उपक्रम शाळांमधून राबविले जातात . पण सांगरूळ हायस्कूलने पाल्याच्या उत्तरपत्रिका थेट पालकाच्या हातात देऊन ओपन पेपर डे साजरा करण्याचा अभिनव उपक्रम राबविला .पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत या उपक्रमाला भरभरून दाद देत समाधान व्यक्त केले .
यामध्ये माता पालकांची संख्या अधिक होती शाळांमधून वर्षभरात होणाऱ्या परीक्षेतील आपल्या पाल्याची प्रगती पालकांना समजावी म्हणून प्रत्येक परीक्षानंतर प्रगती पुस्तक विद्यार्थ्या मार्फत पालकांना घरी देण्याची व पालकाची सही घेऊन शाळेत परत देण्याची परंपरा पूर्वीपासून सुरू आहे .विद्यार्थ्यांच्या मनात पालकांच्या बद्दल असणारी आदरयुक्त भीतीमुळे विद्यार्थी अभ्यास करत होते .पण काळ बदलला आणि काळाबरोबर विद्यार्थीही बदलले .मोबाईल व सोशल मीडियाच्या युगात शालेय विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात आहेत .यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावत आहे .कोरोना काळामध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आला .कोरोना नंतर शाळा पूर्ववत सुरू झाल्या तरी विद्यार्थी मोबाईल मधून बाहेर पडले नाहीत .परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत आहे .दिवसातील केवळ सहा ते सात तास विद्यार्थी शाळेच्या संपर्कात असतो अधिक वेळ तो पालकांच्या व समाजाच्या संपर्कात असतो . घरी अभ्यास करण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांचे कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शिक्षक व पालक या त्रिवेणी संगमातून विद्यार्थ्याला अभ्यासाकडे केंद्रित करून त्याची शैक्षणिक प्रगती साधता येईल या हेतूने शाळेने इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत एकाच दिवशी बोलवून त्यांच्या पाल्यांच्या उत्तर पत्रिका त्यांच्या हातात पाहण्यासाठी देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला . आपल्या मुलांचे पेपर पाहण्यासाठी पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून आली व मोठ्या प्रमाणात पालकांनी उपस्थिती लावत विद्यार्थ्यांचे पेपर पाहणी केले व या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. यातून आपल्या पाल्याच्या प्रगतीची नेमकी स्थिती पालकांना पाहता आली व मुलांच्या शैक्षणिक विकासाकरिता कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे याबद्दल पालकांनी शिक्षकांशी चर्चा केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा नेमका विकास कसा करता येईल याची नेमकी दिशा ओपन पेपर डे च्या निमित्ताने ठरविण्यात आली. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी व पालक यांचा सहभाग वाढवून सर्व गुण संपन्न विद्यार्थी बनवण्यासाठी सांगरुळ शिक्षण संस्थेचे सचिव आमदार प्रा जयंत आसगावकर व संस्थेचे संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्व शाखातून वर्षभर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.
या उपक्रमाचे प्राचार्य एस. एम. नाळे , पर्यवेक्षक एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभाग प्रमुख पी. डी. नाळे यांनी या ओपन पेपर डेचे नियोजन केले. सर्व शिक्षक शिक्षिका यांनी या उपक्रमात सहभागी होत पालकांना योग्य मार्गदर्शन करत चर्चा केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या व पाल्या संबंधी पालकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत पालकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे .
समाधानकारक व नाविन्यपूर्ण उपक्रम
मुलांचे फक्त प्रगती पुस्तक किंवा गुणपत्रक पाहायला मिळत होते .पण प्रत्यक्षात आपली मुले उत्तर पत्रिकेत प्रश्नाची उत्तरे कशा पद्धतीने लिहितात हे ओपन पेपर डे मुळे प्रत्यक्ष उत्तर पत्रिका हातात आल्यामुळे पाहण्यास मिळाले निश्चितच हा उपक्रम चांगला आहे .विद्यार्थ्याला केवळ शैक्षणिक साहित्य पुरवण्यात इतकी जबाबदारी न ठेवता त्याच्या अभ्यासाबाबत काय भूमिका घेतली पाहिजे याची जाणीव झाली
– शुभांगी लव्हटे पालक
उपक्रमाचा निश्चित फायदा होईल
सध्याच्या या युगात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेबरोबरच पालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे .विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारायचा असेल तर शिक्षकांच्या बरोबर पालकांची भूमिका तितकीच मोलाची आहे याची जाणीव ठेवून प्रत्यक्ष उत्तर पत्रिका पालकांच्या हातात देण्याचा निर्णय आम्ही घेतला .त्याला पालकांनी चांगला प्रतिसाद दिला . या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती निश्चितपणे उपयोग होईल
– एस एम नाळे मुख्याध्यापक सांगरुळ हायस्कूल