कोल्हापूर (श्रीकांत पाटील) : भाजपने देशात इन्फ्रास्ट्रक्चर विकास, बेरोजगारी, मुलींना मोफत शिक्षण तसेच महिलांना लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा १५०० रुपये दिले. विकासात्मक विविध योजना राबवल्या. लालबावटा कामगार योजनेंतर्गत जनतेला संसारोपयोगी साहित्य दिले. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात लोकांना चमचा तर दिला काय? अशी खरमरीत टिका खासदार धनंजय महाडिक यांनी केली.

फुलेवाडी जकात नाका येथील वसंत-हरी मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित बांधकाम कामगार साहित्य वाटप योजना, संजय गांधी लाभार्थी, तसेच विशेष कार्यकारी अधिकारी पदाची निवडीची पत्रे वाटप कार्यक्रमात खा. महाडिक बोलत होते. खा. महाडिक म्हणाले, दहा वर्षांपूर्वीची परिस्थिती काय अन आता काय? याची तुलना करा. देशात रस्ते विकास, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट होत आहे. भाजपने कोल्हापूर रेल्वे स्टेशनला ४४ कोटी दिले. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात फक्त आश्वासने दिली. आता विधानसभा निवडणुक येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला खोटी आश्वासन देतील त्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन खा. महाडिक यांनी केले.
विजय घोडके यांनी शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या बेरोजगारासाठी पंधरा दिवस प्रशिक्षण, महिलांसाठी आरोग्य सेवा, आवास योजना यासह विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
प्रास्ताविकात हंबीरराव पाटील म्हणाले, भाजपने कोणत्याही योजनेला अटी लावल्या नाही. आण्णासाहेब पाटील योजना यासारख्या जनतेच्या विकासाच्या योजना राबवल्या. अशा कल्याणकारी योजना राबविण्यासाठी महायुतीचे सरकार येण्यासाठी कंबर कसायची आहे असे आवाहन केले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र दिवसे, शिंगणापूरच्या उपसरपंच सुवर्णा आवळे, दत्तात्रय मेडसिंगे, कोल्हापूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष डॉ. के. एन. पाटील, मारुती बुवा, विजय घोडके, शिवाजी ढेरे, प्रा. वसंत पाटील, शिवाजी तोडकर, विश्वास निगडे, संभाजी पाटील यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन ताज मुल्लाणी यांनी केले. संयोजक दत्तात्रय आवळे यांनी आभार मानले.



