मुंबई : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी आज (गुरुवार, २६ सप्टेंबर) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्तींनी राऊतांना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने संजय राऊत यांना २५ हजार रुपये दंड ठोठावताना ही रक्कम मेधा यांना नुकसान म्हणून देण्याचेही आदेश दिले आहेत. तसेच त्यांना १५ दिवसांची शिक्षा ठोठावली आहे. मेधा सोमय्या यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य नाहीत, असं राऊत यांनी सांगितल्यानंतर त्यांच्यावर या प्रकरणी खटला चालवण्यात आला. या प्रकरणी गुरुवारी निकाल देताना न्यायालयाने मेधा यांची तक्रार योग्य ठरवली. तसेच राऊत यांना मानहानीच्या फौजदारी तक्रारीत दोषी ठरवून १५ दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे
मीरा भाईंदर येथील १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. मात्र बनावट कागदपत्रे सादर करून शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा यांच्यावर केला होता. त्यानंतर, मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी माझगाव न्यायालयात खटला चालवण्यात आला जो मेधा यांनी जिंकला असून न्यायालयाने संजय राऊत यांना शिक्षा सुनावली आहे.