कोल्हापूर :
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना लक्षात घेता त्याचा प्रतिकार करण्यासाठी मुलींनी स्वत: सक्षम व्हावे या हेतूने आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थीनींना सुरक्षित करणारा ‘मी दुर्गा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आमदार ऋतुराज पाटील आणि सौ पूजा ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साने गुरुजी वसाहत व गोकुळ शिरगाव येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
ज्या समाजात आणि संस्कृतीत महिलांना सन्मान मिळतो तोच समाज प्रगती करतो. मात्र आजकाल महिला- मुलींसोबत अनेक वाईट घटना घडत आहे. या सगळ्याला चाप बसणे गरजेचे आहे. वाईट वागणुकीविरोधात आवाज उठवा. न घाबरता धीराने लढायला शिका. आपल्या मदतीला इतरांनी यावे अशी अपेक्षा न बाळगता मुलींनी आता सक्षम होऊन स्वतःच दुर्गा झाले पाहिजे. तुम्हाला सक्षम बनवण्याच्या हेतूनेच मी दुर्गा हा उपक्रम सुरु केला असल्याचे सौ. पूजा ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूर हे अंबाबाई आणि रणरागिणी ताराराणी यांचे शहर आहे. कुठल्याही परिस्थितीत आणि संकटात लढण्याची ताकत आणि सामर्थ तुमच्यात निर्माण झाले पाहिजे. यासाठी आता तुम्ही स्वतःच दुर्गा झाले पाहिजे, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यानिनीशी त्यांनी संवाद साधला.
प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी यावेळी ‘मी दुर्गा’ उपक्रमाविषयी माहिती दिली.




