कोल्हापूर : दोनवडे (ता. करवीर) येथील पेट्रोल पंपाजवळ कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. दुचाकी वरील संग्राम दत्तात्रय पाटील ( वय ३३ रा. पेंडाखळे, ता. शाहूवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. संग्राम यांची पत्नी व कारचालक हे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.
याबाबत माहिती अशी, कारचालक युवराज विष्णू पाटील (रा. फुलेवाडी रिंग रोड) हे पश्चिमेच्या दिशेने चालले होते. संग्राम पाटील व त्यांची पत्नी अश्विनी पाटील हे दोघे दुचाकीवरून गावाकडे चालले होते दोनवडे येथील पेट्रोल पंपाजवळ आले असता कार व दुचाकी या दोघांमध्ये जोराची धडक झाली. यामध्ये दुचाकी चालक संग्राम पत्नीसह शंभर फुटावर जाऊन पडला. अपघातात कारचा डाव्या बाजूचा चक्काचूर झाला. जखमीना ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.




