कोल्हापूर, (प्रतिनिधी)
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून कोल्हापूर येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.
राहुल गांधी शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात येत असून त्या दिवशी त्यांचा मुक्काम असेल. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. या अनावरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. ५ ऑक्टोबरला सायंकाळी कसबा बावड पॅव्हेलियन मैदानावर २००१ कलाकार नाटय सादर करणार आहेत, यामध्ये १ हजार कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसणार आहेत. महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या मध्यमातून केला जाणार आहे असे पाटील यांनी सांगितले.




