दिंडनेर्ली : (सागर शिंदे) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील बंटी व महाडिक गटातील कार्यकर्त्यांच्या मध्ये सध्या सोशल वॉर चांगलाच रंगला आहे.गल्ली पासून दिल्ली पर्यंत च्या राजकारणाचा व नेत्यांच्या कर्तृत्वाचा उदो उदो करत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या कामाचा खरपूस समाचार घेतला जात आहे.
कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने विद्यमान आमदार ऋतुराज पाटील तसेच माजी आमदार अमल महाडिक यांनी गावोगावी विकास कामांच्या उद्घाटनाचा शुभारंभ करण्याचा धडाकाच लावला आहे. त्यामुळे कार्यकर्ते ही उत्साही झाले आहेत.मतदारसंघातील प्रत्येक गावातील चौका चौकात दोन्ही बाजूकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर व खर्च केल्याचे फलक उभे केले आहेत.या फलकावरती काही केलेली कामे व काही नियोजित कामे मंजूर निधीसह छापली आहेत.त्यामुळे कित्येक ठिकाणच्या विकास कामांच्या श्रेय
वादावरून कार्यकर्त्यांच्या मध्ये व्हाट्सअप ग्रुप मधून सोशल वॉर सुरू आहेत.जो तो आपापल्या नेत्याचा उदो उदो करत आहेत तर विरोधी नेत्यावरती आगपाखड करत आहेत.प्रसंगी शिवराळ भाषेत चॅटिंग करून तोंडसुख घेतले जात आहे.यातून कित्येक वेळा वादाचे प्रसंग देखील उद्भवले जात आहेत .ग्रामीण भागात सध्या सुगीचे दिवस असल्याने संध्याकाळी जेवणानंतर कार्यकर्ते चॅटिंग करण्यासाठी आखाड्यात येतात ते मध्यरात्री पर्यंत राजकारणावरून वादविवाद सुरूच ठेवतात.या या चर्चेमध्ये दोन्ही लोकप्रतिनिधींचे पीए देखील आकडेवारीसह हिशोब मांडून आपल्या नेत्यांनी किती विकास केला आहे याचा लेखाजोखा मांडत आहेत. एखाद्या गावातील विकास काम झालेले असेल तर ते कसे चुकीचे आहे कामाचा दर्जा काय आहे इथ पर्यंत परीक्षण केले जात आहे. व्हाट्सअप ग्रुप वरून दररोज असे सोशल वॉर होत असताना ग्रुप मधील कित्येक मंडळी प्रत्यक्ष चर्चेमध्ये सहभागी न होता कार्यकर्त्यांची ही जुगलबंदी पाहत बसण्यात धन्यता मानतात.
व्हाट्सअप ग्रुप वरून वाद विवाद होत असताना केलेले चॅटिंग कित्येक जण स्क्रीनशॉट घेऊन पुरावा म्हणून दाखविण्यासाठी ठेवत आहेत. गावागावांमध्ये आपापल्या नेत्याचे समर्थन करण्यासाठी कार्यकर्ते स्टेटस ठेवून विरोधकांना खुन्नस देत असल्याचे पहायला मिळत आहे.चांगल्याला चांगलं म्हणण्याचे प्रमाण कमी व विरोधकांवरती टीका जादा असा प्रकार सुरू आहे.