राधानगरी – मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्य सरकारने १ एप्रिल २०२४ पासून राज्यातील ७.५ हॉर्सपॉवर पर्यंतच्या सर्व शेती पंप ग्राहकांना मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार ७.५१ हॉर्स पावर पर्यंतच्या शेतकऱ्यांचे विज बिल माफ करून शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र ठरवलेले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांचे ७.५ एच पी मंजूर भार असताना महावितरणने शेतकऱ्यांच्या वीज बिलावर ८, १० असा भार लावल्याने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेपासून हे शेतकरी वंचित राहणार आहेत. त्यामुळे या शेतीपंप वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
सर्व शेतीपंप वीजग्राहकांनी आपला जोडभार, वीज बिल व थकबाकी महावितरण कंपनीला कळवून स्थळ तपासणी करून दुरुस्त आणि अचूक करावी, यासाठी महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडे ताबडतोब लेखी अर्ज दाखल करावेत असे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी राज्यातील १० हॉर्सपॉवर पर्यंतच्या सर्व शेती पंप वीज ग्राहकांना केले होते. त्यानुसार राधानगरी तालुक्यातील वीज पंप ग्राहकांची प्रत्यक्षात तपासणी झाल्यानंतर पंप ग्राहकांचा जोडभार ७.५ हॉ. पॉ. असताना तो वाढवून लावल्याचे सिद्ध झाले आहे.
त्यानुसार तालुका, जिल्हा, विभाग आणि शासन स्तरापर्यंत महावितरण कंपनीने आपला अहवाल सादर केलेला आहे. राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही 4 सप्टेंबर रोजी शासनाकडे तसे निवेदन सादर करून आम्हाला सुद्धा या मोफत योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी केलेली आहे. मात्र दीड महिना होऊन सुद्धा शासन स्तरावरून याला कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याचे शेतीपंपधारकांचे म्हणणे आहे. समन्वयक किसन डबे यांनी याबाबत 7 ऑक्टोंबर रोजी दोन्हीही उपमुख्यमंत्री यांना स्मरणपत्र लिहून न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे.