Friday, January 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपाडळी बु. सेवा संस्थेचे चेअरमन विश्वास पाटील अपात्र..

पाडळी बु. सेवा संस्थेचे चेअरमन विश्वास पाटील अपात्र..

प्रयाग चिखली वार्ताहर:
करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक येथील राजर्षी शाहू विकास सेवा संस्थेचे विद्यमान चेअरमन तसेच येथील छत्रपती शाहू ग्रामीण पतसंस्थेचे विद्यमान संचालक विश्वास शामराव पाटील (माजी सरपंच) यांना सहकार खात्याने दोन्ही पदांवर काम करण्यास अपात्र ठरवल्याची माहिती येथील शाहू पतसंस्थेचे चेअरमन तसेच गटप्रमुख संजय (पी.डी.) पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली
याबाबत अधिक माहिती देताना संजय पाटील म्हणाले , येथील राजर्षी विकास सेवा संस्थेवर विद्यमान चेअरमन म्हणून विश्वास शामराव पाटील हे कार्यरत होते. त्यांना संस्थेकडील येणे कर्जाच्या थकबाकीच्या कारणावरून अपात्र ठरवले आहे. त्याचबरोबर विश्वास पाटील हे येथील छत्रपती शाहू पतसंस्थेचे देखील विद्यमान संचालक झाले त्याचवेळी ते जय भवानी सहकारी दूध संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करत होते. सहकारामध्ये कर्मचारी असलेल्या व्यक्तीला इतर सहकारी संस्थेच्या पदाधिकारी पदी राहता येत नाही असा आक्षेप काही महिन्यापूर्वी सहकार खात्याकडे नोंदवला गेला त्यामुळे विश्वास पाटील यांना पतसंस्थेच्या संचालक पदावरही काम करण्यास अपात्र ठरवले आहे हा निकाल करवीर सहायक निबंधक प्रेमदास राठोड यांनी दिला आहे. त्याबाबत विकास सेवा संस्थेच्या तसेच शाहू पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या पत्रकार बैठकीस चेअरमन संजय पाटील यांच्यासह व्हा. चेअरमन ज्ञानदेव पाटील संचालक संभाजी आंग्रे नारायण कळंत्रे महादेव पाटील हे उपस्थित होते.
दरम्यान पाडळी बुद्रुक येथील दोन गटांतर्गत एकमेकांना अपात्र ठरवण्याचा खेळ चांगलाच रंगात आलेला आहे काही महिन्यापूर्वी विश्वास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या गटातील काहींनी आक्षेप घेऊन पी. डी. पाटील गटातील दूध संस्थेचे तत्कालीन विद्यमान चेअरमन विलास पाटील सह व दोन संचालकांना अपात्र ठरवण्याची यशस्वी खेळी केली होती. त्याचेच उट्टे काढण्याच्या दृष्टीने सध्या विश्वास पाटील यांना अपात्र ठरवून पी डी पाटील गटानेही विरोधी गटाचा वचपा काढला आहे. त्यामुळे येथील राजकाणात नवीन ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
दरम्यान अपात्रतेबाबत खुलासा करताना विश्वास पाटील म्हणाले चुकीच्या कारभाराबाबत मी प्रश्न निर्माण केल्यामुळे तसेच निव्वळ राजकीय सूडबुद्धीने सहकारी कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेऊन माझ्या विरोधात रचलेल्या षडयंत्राविरोधात मी दाद मागितली आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News