मुरगूड / प्रतिनिधी
एका शासकीय अधिकाऱ्याने कागल विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात ग्रामविकास विभागातील पंधराशे कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निधीमध्ये सातशे कोटींचा ढपला पाडल्याचे वर्तमानपत्रातून वाचले हाच कागलचा विकास का ? असा परखड सवाल आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना केला.
मुरगूड येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील होते.
आम.पवार पुढे म्हणाले,शरद पवार साहेबांनी पालकमंत्री मुश्रीफांना ताकद दिली होती इथल्या जनतेला न्याय देण्यासाठी. . पवार साहेब कोल्हापूरच्या बाबतीत त्यांच्याकडे विचारपूस करायचे,त्यावेळी ते कोल्हापूर लई भारी, लई भारी चाललंय असं सांगत होते. पवार साहेबांची त्यांच्याकडून अपेक्षा होती की, आरोग्याचे, शेतकऱ्यांचे, दुधाचे, रोजगाराचे प्रश्न त्यांना दिलेल्या पदांच्या माध्यमातून सुटावेत. एवढीच माफक अपेक्षा त्यांनी ठेवली होती. पण बैठकीत सर्व छान छान असे म्हणत होता. पण आता कळलं की फक्त छान.. छान त्यांच्या घराचे आणि चार कंत्राटदारांचे झाले आहे.
राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, पालकमंत्री कागलचा विकास केला म्हणता, तर मग येथील जनतेला आरोग्य सेवेसाठी पुण्या, मुंबईला का जावे लागते ? हे मंत्र्यांचे अपयश आहे. कागलच्या परिवर्तनास सुरुवात झाल्याने विरोधक भीतीने बोगस मतदानाची प्रक्रिया करत आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भातील पालकमंत्र्यांनी काढलेला जीआर म्हणजे त्यांचा बालिशपणाच आहे.”
गोकुळचे माझी अध्यक्ष रणजित पाटील म्हणाले, ” २५ वर्षात विकासापेक्षा घरे मोडण्याचे तर नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम मुश्रीफांनी केले. त्यांच्या पराभवाचा विडा आता जनतेनेच उचलला आहे. याची जाणीव झाल्यानेच ते धमकीचा वापर करत आहेत.”
यावेळी उबाठाचे जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे, शिवाजी खोत, संकेत भोसले,सौ. स्नेहलता पाटील,अमरसिंह चव्हाण,अजित मोरे , शिवानंद माळी , सागर कोंडेकर यांनी मनोगते व्यक्त केली.
या मेळाव्यासठी विरेंद्रसिंह घाटगे, संतोष मेंगाणे,जनता दलाचे नितीन देसाई,
दलितमित्र एकनाथ देशमूख, सागर पाटील, ॲड.दयानंद पाटील,बजरंग सोनुले,दत्तामामा खराडे आदी उपस्थित होते. स्वागत विशाल भोपळे यांनी,प्रास्ताविक सुनिल जाधव यांनी केले. आभार दगडू शेणवी यांनी मानले.