क्षेत्र आदमापूर/ प्रतिनिधी:
महाविकास आघाडीची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या ए.वाय.पाटील यांनी आज त्यांच्या सोळांकूर गावात पत्रकार बैठक घेऊन राधानगरी, भुदरगड, आजरा, मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली.
आपण या मतदार संघात सांगली पॅटर्न राबवत निवडणूक लढवून विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
गेली तीस वर्षे आपण सहकार, समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून कार्यरत आहोत.विधानसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये थांबवले गेले पण यावेळी कुठल्याही परिस्थितीत न थांबता निवडणूक लढवा असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने आपण ही निवडणूक ताकतीने लढवणार आणि जिंकणार असा दावा पाटील यांनी केला.
मतदार संघात विकास कामांचे ढोल पिटणारे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी दहा वर्षात कोणती विकास कामे राबवली ? असा सवाल त्यांनी यावेळी केला. दहा वर्षात मतदार संघात एकही प्रकल्प आणू न शकलेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांना विकासावर बोलण्याचा अधिकार नसल्याचा त्यांनी सांगितलं.आपण माहिती अधिकारात तालुक्यातील विकास कामांची माहिती मागवली आहे. दोन दिवसात ही माहिती उपलब्ध होताच यावर सविस्तर माहिती देईन.अस ए.वाय.पाटील यांनी सांगितले.
माझा विजय तर होणारच आहे पण राज्यात देखील सांगली पॅटर्न राबवून विजयी होणाऱ्या अपक्ष आमदारांची संख्या लक्षणीय असेल. असा दावा त्यांनी शेवटी केला.
या पत्रकार बैठकीला संतोष मेंगाणे, प्रभाकर पाटील पांडुरंग दुरूगडे,शिवाजी पाटील, अतुल नलवडे,वीरेंद्र देसाई, अविनाश पाटील,नंदूभाऊ यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.