आदमापूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र ,कर्नाटक, आंध्र प्रदेश मध्य प्रदेश, गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा यांची बकरी नुकतेच आदमापुर येथे दाखल झाली आहेत.
दीपावली पाडवा या दिवशी बकरी बुजवणे व लेंढी पूजन अशा संयुक्त धार्मिक कार्यक्रमासाठी ही बकरी आदमापूर येथे आली आहेत. सध्या महाराष्ट्र व कर्नाटकात १९ ठिकाणी बाळूमामांचा बग्गा ( कळप)माध्यमातून ३२ हजार बकरी फिरत आहेत. या बकऱ्यांची बाळूमामांची बकरी म्हणून भक्तगण सेवा करीत आहेत. दिवसेंदिवस बाळमामांची बकरी वाढतच आहेत. दीपावली पाडवा या दिवशी बाळूमामांनी लेंढी पूजन व बकरी बुजवणे हा कार्यक्रम सुरू केला होता. दरवर्षी दीपावली पाडव्याला हा कार्यक्रम असतो तो पार पाडण्यासाठी यावर्षी एक कळप आदमापूर येथे येतो. प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी गावातील महिलांनी बक-यांचे पुजन केले.भंडाऱ्याची उधळण करीत बकऱ्यांचे स्वागत ग़्रामस्थांनी केले.
कारभारी नागाप्पा मिरजे यांचा कळप क्रमांक सहा बग्गा यावर्षी आदमापुर मध्ये दाखल झाला आहे .गावच्या वेशीपासून ढोल कैताळांच्या आवाजात भंडाऱ्याच्या उधळीणीत डॉल्बीच्या ठेक्यावर या बकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर बाळूमामांच्या समाधी स्थळ येथे मालकाच्या दर्शनासाठी बकऱ्यांची मंदिराभोवती प्रदक्षिणा काढण्यात आली. गावातून मरगुबाई मंदिराकडे बकरी जात असताना, सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. ठीक ठिकाणी फटाक्यांचीआताषबाजी करून बकरी आदमापूर येथे आल्याचा जल्लोष साजरा केला. साधारणपणे एक महिना ही बकरी आदमापूर येथे राहणार आहेत. त्यामुळे बकरी तळावर रोज अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात .