कोल्हापूर : ‘जयश्रीताई, तुमच्या या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? असा सवाल शिवसेना उपनेते संजय पवार यांनी एका पत्रकाद्वारे आमदार जयश्री जाधव यांना विचारलाय.
कुठल्याही क्षेत्रातलं काम हिरीरीनं करणारा चंद्रकांत आण्णांचा स्वच्छ निरपेक्ष समाजसेवी असा एक चेहरा अनपेक्षित राजकारणामध्ये आला. तसं म्हटलं तर तत्कालिन गद्दार उमेदवार हा उध्दवजींच्या शिवसेनेचा असला तरी सर्वसामान्यांना दिलेला त्रास व समाजातला प्रत्येक घटकाला दिलेला उपद्रव यामुळं जनतेनं या गद्दाराचा चोख हिशोब मतपेटीद्वारे बजावला. आणि कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच एक उद्योगशील असं व्यक्तीमत्व शहराचा आमदार झाला. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उमेदवारीमुळे उसना आव आणत जयश्रीताईंनी माझ्यावर अन्याय झाला म्हणून शिंदे गटामध्ये कोलांटउडी मारली. चंद्रकांत आण्णांच्या पश्चात आपली जबाबदारी या एकाच भावनेतून नगरसेवक असणाऱ्या आमच्या बहिणीला महाविकाससाठी आघाडीतल्या सर्वच घटकांनी निवडून आणले. पण ह्या उपकाराची व आपल्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या महाविकास आघाडीतील सर्वच कार्यकर्त्यांचा अपमान करत सोयीनुसार निव्वळ प्रलोभनाला बळी पडलात, तुमच्यासाठी राबविलेल्या जनतेची फसवणूक तुम्ही का केलीत? असा सवाल पवार यांनी या पत्रकाद्वारे विचारलाय.
तसंच, जर निवडून येण्याची एवढीच तुम्हाला खात्री होती तर अपक्ष उमेदवारी तुम्ही का लढवली नाहीत.? उद्धव ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानत हात चिन्हाचा प्रचार करणाऱ्या हिंदूत्ववादी शिवसैनिकांची काय चूक होती? गद्दार वृत्तीला साथ देण्याची तुमची ही सध्याची नवीन जबाबदारी आता कोल्हापूरच्या पेठापेठातील व उपनगरांमध्ये वसलेल्या जनतेला कृतघ्नपणाची वाटू लागलीय. तुमच्या या अवसानघातकी कृतघ्नपणाच्या पक्षांतराचे उत्तर द्या. या निवडणुकीमध्ये गद्दाराला हद्दपार – केल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत, असा इशाराही पवारांनी दिलाय