Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomePOLITICALखासदार शाहू महाराज यांची पत्रकाद्वारे कालच्या नाट्यमय घडामोडी विषयी भूमिका..

खासदार शाहू महाराज यांची पत्रकाद्वारे कालच्या नाट्यमय घडामोडी विषयी भूमिका..

कोल्हापुर : विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरात उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी काल घडल्या. कॉंग्रेसचे राजेश लाटकर यांनी बंडखोरी करत कोल्हापुर उत्तर मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे कॉंग्रसेचे नेते सतेज पाटील हे चांगलेच भडकले. त्यांचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात शाहू महाराज देखील प्रचंड प्रमाणात ट्रोल होत आहेत. त्यावर आता खासदार शाहू महाराज यांनी आपली भूमिका आपल्या पत्राद्वारे मांडली आहे.
अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही. एका कुटुंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही, असे आमचे आधीच ठरले होते. त्यामुळे त्या काँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या. परंतु राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोध होऊ लागल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहास्तव काँग्रेस पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती.
लाटकर यांनी उमेदवारी मागे घेतली तरच लढायचे असे आमचे ठरले होते आणि लाटकर कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेतही आम्ही त्यांच्याजवळ ही गोष्ट स्पष्ट केली होती. लाटकरांशी झालेल्या भेटीचा वृत्तांत पक्षनेतृत्वाला दिला होता. त्यांनी माघार न घेतल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा सन्मान राखावा म्हणून अखेरच्या क्षणी आम्ही माघारीचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी राजेश लाटकर हे काँग्रेस विचाराचे पर्यायाने कॉग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी प्रयत्न करणार आहोत.
विधानसभा निवडणुकीच्या माघारीनंतर काही लोक सोशल मीडियावर मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. कोल्हापूरच्या साडेसात लाखांहून अधिक लोकांनी मला विक्रमी मते देऊन निवडून दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेत मी काम करीत आहे आणि काँग्रेसचा व महाविकास आघाडीचा खासदार म्हणून लोकांची सेवा करीत राहणार आहे.
आम. पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत. राज्यपातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करीत आहेत. त्यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधील राजेश लाटकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या अन्य चार जागा तसेच महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत.
माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकर्त्यांना उ‌द्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत. प्रत्यक्षात सतेज पाटील यांच्याकडून तसे काही घडलेले नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. माघारीच्या घटनेनंतर आम्ही भुदरगडच्या कार्यक्रमात एकत्र होतो आणि तिथून एकाच गाडीतून परत आलो. असेही त्यांनी म्हंटले आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News