कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने सध्या चांगलाच जोर पकडला असून महायुतीच्या वतीने आज (5 नोव्हेंबर) कोल्हापूरमध्ये संयुक्त जाहीर सभा घेण्यात आली. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पण याचसोबत माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत मोठी घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने जो राज्याचा अर्थसंकल्प सादर केला त्यात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि दोनच महिन्यात त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली. ज्यानुसार गरजू महिलांना दरमहा सरकार 1500 रुपये देत आहे.
मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील जाहीर सभेत लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून देण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत महिलांना 1500 रुपये देण्यात आले आहेत. मात्र निवडणुकीनंतर पुन्हा आपलं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करून ते दरमहा 2100 रुपये एवढे देण्यात येतील अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केली आहे