मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला एकजूट करणारे मनोज जरांगेंनी कुणाला पाडायचं हे अखेर स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर यावेळी जरांगेंनी फडणवीसांवर निशाणा साधत विश्वासघाताचा आरोप केलाय.
लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महायुतीला जोरदार फटका बसला. त्यानंतर विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी निवडणूक लढवण्याची रणनीती आखली होती. त्यासाठी जरांगेंनी बैठका घेत मराठा मुस्लीम, दलित समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जरांगेंनी निवडणूक न लढवता पाडापाडी करणार असल्याचं स्पष्ट केलं.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, तुमच्या हिताचा निर्णय तुम्ही घ्या. संभ्रम नकोय. तुम्हाला वाटत असेल त्याला पाडा. मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराकडून काही लिहून घेण्यापेक्षा त्यांचे मराठ्यांनी व्हिडिओ मराठ्यांनी घ्यावे. आपल्या मताला जो सहमत असेल त्याला तुम्ही मत द्या. मराठ्यांना सगळं माहीत आहे. आपला समाज सुज्ञ आहे. मी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. कोणाला मत द्यायचं हे मराठा समाजाला सांगायची गरज नाही, असंही मनोज जरांगे यांनी म्हंटलं आहे.
आपल्या लेकराबाळांचा घास ज्यांनी हिसकावून घेतला त्यांना सोडायचं नाही. मराठ्यांनी एकजूट होऊन मतदान करायचं. मराठा समाज मला संकटात सापडू देणार नाही. सर्वांनी एकजुटीने मतदान करा, यापुढे मला समाजाच्या आरक्षणासाठी पूर्णवेळ काम करायचं आहे, अशी माहिती देखील जरांगे पाटील यांनी यावेळी दिली.