कोल्हापूर : महाविकास आघाडीला सत्ता द्या.
असे म्हणत प्रियंका गांधी यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असून त्यासाठी महाविकास आघाडीला सत्ता द्या असे आवाहन केले.
तरुणांना अडीच लाख नोकर्या देऊ, महिलांना दरमहा तीन हजार रुपये, जातनिहाय जनगणना करण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांंधी यांनी आज गांधीमैदान येथील भाषणात केले.
त्या म्हणाल्या महागाई प्रचंड वाढली आहे. लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. मुलांना शिक्षण कसे द्यायचे, त्यांची फी कशी भरायची, फीसाठी कर्ज काढावे लागते, दिवस-रात्र काबाडकष्ट करूनही महागाईचा सामना करता येईना झाला आहे. कुटुंबातील अनेक सदस्यांनी काम करूनही महागाईपुढे त्यांना हार मानावी लागली आहे. उपचाराची स्थितीही अशीच आहे. महागाई, बेरोजगारी, शिक्षण, महिलांचा सन्मान आदी प्रश्नांबाबत त्यांच्याकडे कोणतेही उत्तरदायित्व नाही. या गोष्टी फक्त ते व्यासपीठावरून बोलतात आणि सोडून देतात. जनतेला कोणतीही उत्तरे देत नाहीत.
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायचे आणि त्यांचाच मुलगा उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा, संविधानावर आधारित स्थापन झालेले सरकार फोडाफोडी करून चोरायचे, भ—ष्टाचार रोखण्याची भाषा करायची आणि सत्तेसाठी आमदार, खासदारांची खरेदी-विक्री करायची, जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर काही बोलायचे नाही आणि निवडणुका आल्या की जात आणि धर्माच्या नावावर मते मागायची, असा कार्यक्रम भाजप महायुतीकडून सुरू आहे. त्यांना रोखण्याची जबाबदारी देशाला दिशा दाखविणार्या महाराष्ट्रावर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. खोटे बोलणार्या या सरकारला स्वाभिमानी महाराष्ट्राने सत्तेपासून दूर ठेवावे, असेही त्या म्हणाल्या.