कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीचेच स्थिर आणि भक्कम सरकार येणार, असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी व्यक्त केला. कोल्हापूर विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते.
भाजपकडून लोकांना धमकवलं जात आहे. त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. ईडी, सीबीआयची भिती दाखऊन, पक्ष फोडले गेले. मात्र आम्ही, महाराष्ट्राला एक चांगलं स्थिर सरकार देऊ असंही त्यांनी सांगितलं.
भाजपला हरवून नवे सरकार आणण्यासाठीच आम्ही एकत्र आल्याचे सांगत खर्गे म्हणाले, ‘पन्नास खोके एकदम ओक्के’वाले हे महायुतीचे सरकार सत्तेतून पायउतार होणार हे स्पष्ट आहे. नवे आणि मजबूत महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना मिळणारा प्रतिसाद पाहता तसे स्पष्ट दिसत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईतही महाविकास आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, तसा फीडबॅकही येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, कर्नाटकचे आमदार हसन मौलाना, माजी आमदार अंजली निंबाळकर, कोल्हापूर उत्तर विधानसभेचे निरीक्षक सुखविंदर ब्रार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक तोफिक मुल्लानी, बाळासाहेब सरनाईक, संध्या घोटणे, सरलाताई पाटील, भारती पोवार आदी उपस्थित होते.