बाजारभोगाव : जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कळे पोलिसात अज्ञात पाच ते सहा लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.तर या प्रकरणाचा तपास कळे पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला आहे.या तपासासाठी दोन पथके नेमली आहेत.
रविवारी (दि.१७) संताजी घोरपडे त्यांचे सहकारी डॉ. शुभम जाधव (मांडुकली, ता. गगनबावडा) हे दोघे जांभळी खोऱ्यातील मानवाड (ता.पन्हाळा) येथे प्रचारासाठी गेले होते. रात्री सव्वा अकराच्या सुमारास ते चारचाकीतून परत येतांना मानवाडपासून एक किलोमीटर अंतरावर रस्त्याशेजारी पाच ते सहा अज्ञात व्यक्ती उभे राहिले होते. त्यांनी घोरपडे यांच्या गाडीला हात केला. ते ओळखीचे असावेत असे समजून आपली चारचाकी थांबवून गाडीतून उतरले असता त्यांच्यापैकी एकाने क्षणाचाही विलंब न करता धारदार शस्त्राने घोरपडे यांच्यावर हल्ला केला. तर त्यांच्यापैकी एका व्यक्तीने दगड मारून गाडीची काच फोडली. बघून घेतो अशी धमकी देत हल्लेखोर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शेतवडीतून पळाले. यामध्ये संताजी घोरपडे यांना गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाला होता. सध्या त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घोरपडे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेतली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांचीही भेट घेउन निवेदन दिले.
ज्याठिकाणी घटना घडली ते ठिकाण दुर्गम आहे. तसेच तळकोकणातून कत्तलीसाठी देशी गायींची वाहतूक राजरोसपणे सुरू असते. त्यांच्यावर संताजी घोरपडे यांच्या पुढाकाराने कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अनेकदा कारवाई केली आहे. त्यामुळे कत्तलीसाठी गायी नेणाऱ्यांचा घोरपडे यांच्यावर रोष आहे. निवडणूकीच्या सर्वच पक्षांकडून अंतिम टप्प्यात मतदारांसोबत आर्थिक देवघेवीचे प्रकार घडतात. मतदारांना आमिषे दाखवली जातात. त्यामुळे गटागटात वादाचे प्रकार घडतात. सहानुभूती मिळविण्याचेही प्रकार घडतात. तसेच संबंधित उमेदवाराचे व्यक्तिगत वाद यादृष्टीनेही कांही धागेदोरे हाती लागतात काय हे तपासण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.