साळवण प्रतिनिधी (एकनाथ शिंदे): केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नॅशनल अॅचिव्हमेंट सर्व्हे (नॅस) परीक्षा २९ नोव्हेंबर रोजी ऑफलाईन होणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सरावासाठी शिक्षण विभागाने ऑनलाईन सराव चाचणी घेण्याचा घातलेला घाट विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. शिक्षण विभागाच्या वतीने रविवारी घेतलेल्या नॅस ऑनलाईन सराव चाचणीस जिल्ह्यातील सुमारे दीड लाख विद्यार्थी बसले होते. परंतु, सराव चाचणीची ऑनलाईन लिंक वेळेवर ओपन न झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यातच गगनबावडा तालुक्यात अनेक ठिकाणी बीएसएनएल, जिओचे नेटवर्क गायब झाल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
ऑनलाईन प्रणाली व्यवस्थित सुरू नसल्याने लिंक ओपन न होणे, केंद्राचे नाव व इयत्ता ओपन न होणे, सबमिट न होणे यासारख्या समस्यांचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचा प्रत्यय रविवारी आला. काही ठिकाणी तर ऐनवेळी पालकांच्या मोबाईलवर संदेश पाठवून ही परीक्षा ऑनलाईन देण्याची सूचना करण्यात आली. तोपर्यंत परीक्षाविषयी काहीच माहिती देण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. अशा पद्धतीने ऐनवेळी संदेश टाकून या परीक्षा का घेतल्या जातात, अशी विचारणा होत आहे.
सराव चाचणी एक व दोन या कोल्हापूर जिल्ह्यातील मराठी माध्यम शाळांमधील इयत्ता २ री ते ९ वी पर्यंत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. तर सराव चाचणी तीन ही इयत्ता तिसरी, सहावी व नववीसाठी मराठी, इंग्रजी, उर्दू व सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिली सराव चाचणी १७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली.
दुसरी सराव चाचणी २४ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे, तर अंतिम चाचणी ही ऑफलाईन स्वरुपात २९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. ‘नॅस’ सराव चाचणी परीक्षा दुसरी ३० गुणांची, तिसरी ते सहावीपर्यंत ४५ गुणांची, तर सातवी ते नववीसाठी ६० गुणांची होती. यासाठी तीन तासांचा कालावधी होता. दुसरी ते पाचवी परीक्षेची वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत, तर सहावी ते नववी परीक्षेची वेळ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होती.