कळे: वाघुर्डे (ता.पन्हाळा) येथे लोकशाही अधिक बळकट व्हावी या उद्देशाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे करवीर विधानसभा मतदारसंघांतील २७५/७० व ७१ ही मतदान केंद्रे ‘आदर्श मतदान केंद्रे’ म्हणून ओळखली जाणार आहेत. ग्रामपंचायत अधिकारी रामहरी वरकले यांनी लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी ‘वनराई’ ही थीम निवडून मतदान केंद्रावर आकर्षक मंडपाची उभारणी केली आहे.
यामध्ये डिजिटल फ्लेक्ससह फुग्यांची व केळी-नारळीची स्वागत कमान उभारून मतदारांसाठी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला आहे. मतदारांचे औक्षण करून बालकांनी विविध प्राण्यांच्या वेशात, छोटा भीमच्या वेशात लोकशाही अधिक बळकट करण्याच्या शुभेच्छा देणार आहेत. मतदारांना प्रोजेक्टरद्वारे मतदानासाठीची आवश्यक माहिती प्रदर्शित करणार आहेत. मतदारांसाठी प्राथमिक आरोग्य टेबल, बीएलओ टेबल, वाचन साहित्य, पिण्याच्या पाण्याची सोय, स्तनदा मातांसाठी सर्वसोयीनियुक्त हिरकणी कक्ष उभारला आहे. शाळेच्या मुलांकडून पथनाट्यद्वारे शंभर टक्के मतदान करा आपले मत बहुमूल्य आहे, ते विकू नका असा मोलाचा संदेश देणार आहेत. बालकलाकार मतदारांचे हालगीच्या गजरात स्वागत करणार आहेत. मंडपाला केळीचे खांब बांधून प्रत्येक खांबावर लोकशाहीचे घोषवाक्य व लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आकर्षक पाट्या लावल्या आहेत. लहान मुलांसाठी गोष्टींची छान छान पुस्तके , नियतकालिके , खेळणी, आकर्षक कुंड्या, केंद्राच्या स्वागत कमानीपासून चारही बाजूला आकर्षक रंगीत रांगोळी, जणू काही आज प्रत्यक्षात लोकशाहीच वाघुर्डे गावी अवतरली असावी, असे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणार आहे.
सरपंच अमोल नवलव, उपसरपंच सुभाष पाटील, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश गुरव, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, तलाठी पी.के. मिठारी, कृषी सहाय्यक एम.ए.हवालदार, पोलिस पाटील सुरेखा पाटील, स्वस्त धान्य दुकानदार रंगराव शिखरे, संदीप नवलव, अंगणवाडी सेविका, मदतनीस, समूह संसाधन व्यक्ती, ग्रा.पं. कर्मचारी, केंद्रस्तरीय मतदान नोंदणी अधिकारी खंडेराव पाटील, संगीता पाटील, सर्व दूध संस्था, शिक्षक वृंद व शाळेचे विधद्यार्थी यांचे सहकार्य व तसेच पंचायत समिती पन्हाळाच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर , विस्तार अधिकारी वासुदेव कांबळे, पी. डी. भोसले, राजेंद्र तळपे यांचे मार्गदर्शन लाभले.