मुंबई : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचं रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात नेमकी कोणाचं सरकार येणार? याबाबत दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. अशातच २१ नोव्हेंबर रोजी अदाणी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी यांच्यावर अमेरिकेच्या विधि विभागाकडून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला. त्यासंदर्भात अदाणींवर गुन्हा देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
या आरोपानंतर अदाणी समूहाकडून स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळण्यात आले. मात्र, यावर आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देत खोचक टीका केली आहे. “काल जो बॉम्ब फुटला तोच बॉम्ब चार दिवस आधी फुटला असता तर स्फोट मोठा झाला असता”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.