राधानगरी – जनतेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, प्रकल्प बाधितांचे योग्य पुनर्वसन व भरपाई मिळाली पाहिजे असे शासनाचे धोरण असताना राधानगरी तालुक्यातील कोते ग्रामस्थ १९९७ पासून गेली २७ वर्षे कोते गावाजवळ तुळशी नदीवर पूल बांधणेसाठी संपादन केलेल्या जमिनीच्या भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. आता तर याच मार्ग आणि पुलावरून प्रस्तावित बालिंगे ते दाजीपूर राज्यमार्ग होणार असून सध्या रस्ता रुंदीकरनाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु आमची पहिली भरपाई मिळाल्याशिवाय रस्त्याचे काम होऊ देणार नाही,’ असा सज्जड इशारा या ग्रामस्थांनी प्रशासनास दिला आहे.
आज कोते येथे या ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. याचबरोबर जिल्हाधिकारी, प्रांतधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता सा. बां. विभाग यांना जमिनीची भरपाई व्याजासह मिळावी अशी निवेदणाद्वारे मागणी केली आहे.
याबाबत निवेदनावर ५१ ग्रामस्थ्यांच्या सह्या आहेत. निवेदनात म्हंटले आहे की, आमची मौजे- कोते व मौजे- चांदे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर येथील कोल्हापूर जिल्हयातील रा.मा. क्र. ११५ पासून शेणवडे – अणदुर धुंदवडे- चौधरीवाडी -म्हासुर्ली-कोते-चांदे-राशिवडे बु. परिते रा.मा. १३० ला मिळणारा प्रजिमा ४० वर कोते गावाजवळ तुळशी नदीवर पूल बांधणेसाठी आमच्या जमीनी १९९७ साली ताब्यात घेऊन सदरच्या पुलाचे व जोडरस्त्याचे काम पूर्ण केलेले आहे. सदरच्या जमींनी ताब्यात घेत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी यांनी सदर जमींनीचा मोबदला किमान ६ महिन्यात संपादनाची कार्यवाही करुन देण्यात येईल असे सांगीतले होते. परंतु प्रशासनाकडून भरपाईस विलंब लागत असल्यामुळे संबंधित विभागाकडे आम्ही आमच्या जमिनींचा मोबदला मिळण्यासाठी सारखा तगादा लावल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना प्रस्ताव सादर केला होता.
संयुक्त मोजणीचा अहवाल व संपादन करण्यासाठी कार्यकारी अभियंता यांनी पाठविलेल्या प्रस्तावमध्ये तफावत असल्याने उपविभागीय अधिकारी यांनी सन २०१०, २०११, २०१२, २०१३ मध्ये कार्यकारी अभियंता यांना कळविले होते. परंतु सदरच्या पत्रावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याने उपविभागीय अधिकारी यांनी भूसंपादन कायदा १८९४ चा प्रस्ताव रद्दसाठी सन २०१४ ला जिल्हाधिकाऱी कोल्हापूर यांना पाठविलेला होता. त्यानंतर आम्ही उपअभियंता, सा.बा.उपविभाग राधानगरी यांना १३ एप्रिल २०१५ अन्वये जमींनीचा चालु बाजारभावाप्रमाणे मोबदला मागणीसाठी अर्ज सादर केला होता. सदरच्या अर्जावरही संबंधित विभागाने आजतागायत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.असेही निवेदनात म्हटले आहे.