मुंबई : महाराष्ट्रात आज (दि.५) पुन्हा एकदा ‘देवेंद्र पर्वा’ला प्रारंभ झाला. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांना राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे २१ वे मुख्यमंत्री असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, अनंत अंबानी, अभिनेता शाहरुख खान, अभिनेता सलमान खान, अभिनेता रणबीर कपूर,अभिनेता रणवीर सिंग, अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेत्री विद्या बालन यांची प्रमुख उपस्थिती होती.