धुळे : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर विरोधकांकडून अद्यापही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. महायुतीचं सरकार स्थापन झालं असून मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटची बैठक घेऊन आजपासून विशेष अधिवेशनही सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधी न करण्याचा निर्णय घेतला. तसेच, ईव्हीएमविरोधात जनआंदोलन उभारणार असल्याचंही मविआ नेते म्हणाले. त्यानुसार, मविआच्या नेत्यांनी आज विधानसभा परिसरातही ईव्हीएमविरुद्ध आवाज उठवला. त्यातच, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आय लव्ह मारकडवाडीचा बोर्ड झळकावत लक्ष वेधलं.
निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर धुळेकर नागरिक आमची भेट घेऊन आम्हाला सांगत आहे की आम्ही सर्वांनी तुम्हाला म्हणजे मशालीला मत दिले होते, आमचे मत गेले कुठे असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित करत आहे. म्हणून आम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी 9 डिसेंबर रोजी सायंकाळी धुळे शहरातून विशाल असा मशाल मोर्चा काढणार असून ईव्हीएम मशिनची प्रतिकात्मक अंतयात्रा देखील काढणार असल्याची माहिती अनिल गोटे यांनी यावेळी दिली.