सांगरूळ / वार्ताहर:
त्यांनी दहावीची परीक्षा दिली .त्यानंतर प्रत्येकाच्या शिक्षणातील वेगवेगळ्या वाटा . कोणी शिक्षक डॉक्टर तर कोणी शासकीय व निमशासकीय नोकरीत तर कोणी व्यवसायिक क्षेत्रात कार्यरत . काहीनी तर दहावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकत पारंपारिक शेती व्यवसायाला वाहून घेतले . काही मुलींचे तर परीक्षा होताच विवाह झालेत .बघता बघता दिवस सरले .सर्वजण आपापल्या व्यापात मुलाबाळात नातवंडात रमूण गेले . इतरांचे होणारे स्नेह मेळावे पाहून आपल्या बॅचचा सुद्धा स्नेह मेळावा घ्यावा ही कल्पना यातील काही वर्गमित्रांच्या मनात आली आणी तब्बल ४० वर्षानंतर त्यांच्यातील मित्रत्व जागे झाले .एकमेकाला संपर्क करत स्नेह मेळावा आयोजित करत गुरुजनासह एकत्र आलेत . आणि शालेय जीवनातील आठवणीत रमूण गेलेत . निमित्त होते सांगरुळ हायस्कूलच्या मार्च १९८५ च्या बॅचच्या स्नेहमेळाव्याचे .
यासाठी बॅचला शिकवणारे तत्कालीन गुरुजनाना सन्मानाने निमंत्रित करून त्यांच्या प्रति असणारी कृतज्ञता व्यक्त केली होती . यावेळी सांगरूळ हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य जी. पी. नाळे, ,डी डी कुंभार एस. एस. कुलकर्णी , आय एस जंगम , बी. आर. नाळे ,आर. एस. शेटे ,जे आर गोडसे, आर एस मर्दाने,आर एस जाधव,बी एस सुतार श्रीमती के आर सनगर आर एन सुतार के आर सुतार डी एम नाळे एम जी कांबळे उपस्थित होते .विशेष म्हणजे बऱ्याच दिवसांनी मित्र मैत्रिणी एकत्र येणार असल्याने बॅच मधील सर्वजण उस्फूर्तपणे उपस्थित होते .त्यांच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी एकत्र येण्याबद्दलचा आनंद ओसंडून वाहत होता .
सांगरूळ हायस्कूलच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनी पुष्पवृष्टी करत शाळेच्या सेवानिवृत्त गुरुवर्य व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे स्वागत केले . प्राचार्य एस एम नाळे यांनी सर्वांचे स्वागत करून शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला . यावेळी माजी विद्यार्थ्याकडून शाळेला दहा हजार रुपये शाळा विकासासाठी दिले . शाळेने केलेल्या स्वागता बद्दल माजी विद्यार्थ्यांच्या वतीने एकनाथ कोपार्डेकर सर्जेराव नाळे व आनंदा खाडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ गुरुवर्य जी. पी. नाळे होते . अध्यक्ष स्थानावरून बोलताना जी पी नाळे यांनी तब्बल ४० वर्षानंतर विद्यार्थ्यांनी गुरुजनांची आठवण ठेवत त्यांच्या प्रति असणारी आपुलकी जपली आहे .हे कौतुकास्पद आहे व आम्हा गुरुजनांना अभिमानास्पद आहे असे सांगितले अध्यापक एम के जंगम व श्रीमती के आर सनगर यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत शुभेच्छा दिल्या.
स्वागत प्रा डॉ सुरेश चौगले यांनी तर प्रास्ताविक चंद्रशेखर खोले यांनी केले. यानंतर प्रत्येकाने आपल्या शालेय जीवनातील आठवणी व सध्याचे जीवन या बद्दल मनोगत व्यक्त केले . बॅचच्या वतीने उमेद फाउंडेशन ला तीन हजार रुपये सामाजिक कार्यासाठी देण्यात आले .
सूत्रसंचालन गजानन लव्हटे यांनी केले . आभार राजू अत्तार यांनी मानले .